सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई
भारत सरकार | महाराष्ट्र शासन
महाराष्ट्राला सांस्कृतिक व कलेचा उच्च कोटीचा ठेवा लाभलेला आहे. हा वारसा आपण आजपर्यंत जतन करत आलेलो आहोत. परंतु सध्या बदलत्या काळामध्ये खाजगीकरण, उदारीकरण, पाश्चातीकरण आणि नव माध्यमांचे आक्रमण यामुळे आपली कला व संस्कृती बऱ्याच अंशी लोप पावत चाललेली आहे. या लोप पावत चाललेल्या कला व संस्कृतीला पुन्हा एकदा राजाश्रय व लोकाश्रय मिळणे अत्यंत आवश्यक झालेले आहे.
महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आदिवासी संस्कृती, कृषी संस्कृती, भक्ती संस्कृती, वाद्य संस्कृती, खाद्य संस्कृती, वस्त्र संस्कृती, चित्रपट संस्कृती, नाटक संस्कृती, ग्रामीण संस्कृती, बोलीभाषा, दुर्मिळ दस्तावेज, मौखिक परंपरा, दृष्यात्मक कला, अशा कितीतरी बाबी अंतर्भूत आहेत. यामधील अनेक घटक आज एक तर नामशेष झाले आहेत किंवा अस्तंगत होत चाललेले दिसत आहेत. या सर्वांचे जतन, वहन व संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
या संकेतस्थळाचा मुख्य उद्देश हा, आपल्या संस्कृतीतील अस्तंगत होणारे किंवा लोप पावलेले घटक यांचे संवर्धन करणे हे होय
आपल्या भागात असणाऱ्या कला व संस्कृती विषयक दुर्मिळ किंवा बाहेर ज्ञात नसणाऱ्या बाबीविषयी आपण या संकेतस्थळावर अपलोड करू शकता. यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने हे अपलोड करता येईल. हे अपलोड झाल्यानंतर ते संचालनालयाच्या स्तरावर तपासले जाईल. अगदीच नाविन्यपूर्ण असलेली माहिती ही लोकांसाठी खुली करण्यात येईल.नाविन्यपूर्ण व अनोख्या माहितीसाठी एक प्रमाणपत्र संचालनायमार्फत दिले जाईल. अगदी दुर्मिळ असलेली माहिती असेल तर, त्याच्यासाठी आर्थिक बक्षिसाची तरतूदही केली जाईल.
आपणा सर्वांना आवाहन आहे की, आपल्या भागातील या अस्तंगत व लोप होत चाललेल्या कला आणि संस्कृतीतील घटकांचे आपण अपलोड करावे आणि आपला समृद्ध कला संस्कृतीचा साठा अजून समृद्ध करावा. सोबत दिलेल्या लिंकवर आपण क्लिक केल्यास त्यामध्ये अनेक विकल्प दिसून येतील. आपण हव्या असलेल्या विकल्पावर क्लिक करून आपली माहिती लगेच अपलोड करू शकता. यामध्ये शब्द रूपात माहिती अपलोड करणे, व्हिडिओ रूपात माहिती अपलोड करणे, ऑडिओ रूपात माहिती अपलोड करणे इत्यादी सुविधा आहेत
इंडो आर्यन कुलातील मराठी एक महत्वपूर्ण भाषा आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र व गोवा या राज्यांबरोबर भारतातील बऱ्याचशा राज्यात व काही देशांमध्ये ही भाषा बोलली जाते. जवळजवळ १० कोटी लोकांची ही प्राथमिक किंवा व्दितियक भाषा आहे. वऱ्हाडी, मालवणी, अहिराणी, आगरी, माणदेशी, कोकणी या व अशा अनेक बोलीभाषा अस्तित्वात आहे. शिवाय दर १२ मैलांवर भाषा बदलत असते. त्या नुसार बदलणारे भाषेचे स्वरूप वेगवेगळे आहे. प्रादेशिक विभागानुसार भाषेचे वेगवेगळे प्रकार आहेत. आदिवासी समुहापासून ते सिलिकॉन व्हॅलीपर्यंत वेगवेगळ्या स्वरुपात, लयात, ढंगात बोलली जाणारी ही भाषा फक्त भाषा नसून संस्कृतीने ओतप्रेत भरलेला खजिनाच आहे. सुमारे १५०० वर्षे वयाची ही भाषा काळानुरूप स्वतःमध्ये बदल करत पुढच्या आव्हानासाठी सज्ज आहे. बाह्य आक्रमणे, बाह्य भाषिक आक्रमणे, जागतिकीकरण व भाषा धोरणे यामधूनही या भाषेने आपले अस्तित्व निर्विवाद राखलेले आहे.
भाषा म्हणजे फक्त लेखन वाचन नसून ती व्यक्त करण्यासाठी आवश्यक असणारी संस्कृती, ही त्या भाषेशी जोडणारा दुवा असतो. भाषा ही संस्कृतीमुळेही समृध्द होत असते. विविध सांस्कृतिक बाबी भाषेशी निगडीत असतात. सण, उस्तव, समारंभ, खेळ तसेच इतर अनेक प्रसंगातूनही भाषा समृध्द होत असते. काळओघात सण, उत्सव, समारंभ, खेळ इत्यादीमध्ये खूप बदल झाल्याने आपोआपच त्यासंबंधीचे शब्द ही लोप पावत चाललेले आहेत. मराठीमध्ये ५० वर्षांपूर्वी दैनदिन जीवनात बोलले जाणारे शब्द अपवाद वगळता ऐकायला मिळत नाहीत. उदाहरणादाखल बैलगाडी या वाहनप्रकाराशी संबंधित कितीतरी शब्द लोप पावत चाललेले दिसून येतात. बैलगाडीच्या विविध भागांना असणारी नावे विविध प्रदेशात भिन्न आहेत. मात्र काळओघात ही नावे मागे पडत असून काही वर्षांनी ती नामशेष होतील. ह्यामुळे अशा शब्दांचे जतन करणे आवश्यक आहे. बैलगाडी या वाहनामध्ये ; जू,एटन, आरी, चाक, वंगण, दिंड, आकरी, पाटल्या, साठा, कणा इ. शब्द सोलापूर सारख्या भागात वापरले जातात. तसेच शब्द इतर ठिकाणी / इतर प्रादेशिक विभागात वापरले जातात. जर बैलगाडी विषयक सर्व शब्दांचे एकत्रीकरण केले तर नामशेष होत चाललेले शब्दभांडार वाचवता येवू शकेल. साधारणपणे १९८० पासून डिझेल इंजिन व इलेक्ट्रिक पंप यांचा वापर सुरु झाला. नव्वदच्या दशकात स्वयंचलित वाहनांमध्ये विस्तार होण्यास सुरवात झाली. १९५० च्या आसपास जन्म झालेले अनेक शेतकरी आज हयात आहेत. त्यांच्याकडे हा शब्दसाठा उपलब्ध आहे. योग्य मार्गाने गेल्यास समाजमाध्यमे व इंटरनेट सहाय्याने आपण हा शब्द साठा सहज उपलब्ध करू शकतो.
जी कथा मराठीतील लोप पावत असणाऱ्या शब्दांची तशीच कथा लोप पावत असणाऱ्या सण उत्सव व समारंभातील प्रथा परंपराबाबतची ! महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरील मराठी भाषिक व्यक्ती चैत्रापासून ते फाल्गुनपर्यंत वेगवेगळे सण साजरे करत असतो. स्थानपरत्वे सण साजरा करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. उदाहरण घ्यावयाचे झाल्यास गुढीपाडवा हा सण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. छोटे-मोठे सण, शेतीशी निगडीत उत्सव, स्थानिक प्रथा परंपरा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आहेत. बदलत्या जीवन शैलीबरोबर व प्रचंड वेगासोबत या प्रथा परंपरा एकतर लोप पावत आहेत किंवा त्यामध्ये Short Cuts येत आहेत. उदाहरणादाखल पश्चिम महाराष्ट्रात “खळजेवण” नावाची परंपरा २५ वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. शेतातील धान्याची मळणी झाल्यानंतर खळ्यामध्ये धान्याची रास ठेवण्यात येई. रात्री त्या नवीन धान्यातील धान्यापासून भाकऱ्या / चपात्या बनवत. वांगी, शेवगा दही चटण्या सोबत या भाकरी / चपाती यांचा आस्वाद खळ्याच्या गोलाकार बसून घेण्यात येई. शेजारी – पाजारी. पै-पाहुणे, सावड केलेले शेतकरी सर्वजण प्रथम धान्याची पूजा करत नंतर कोणी भजन / गाणी म्हणे आणि शेवटी जेवण घेऊन “खळ जेवण” कार्यक्रमाची सांगता होई.
सद्यस्थितीत “खळ जेवण” वा असे अनेक कार्यक्रम लोप पावत चाललेले आहेत. समाजमाध्यमे व इंटरनेट मायाजालात एक दिवस असे कार्यक्रम, उत्सव, प्रथा परंपरा लोप पावत जातील.
सण, समारंभ, उत्सव, प्रथा, परंपरा याप्रमाणेच ग्रामीण खेळ हा एक महत्वाचा प्रकार आहे. काळओघात आज कितीतरी खेळ नामशेष होत चाललेले आहे. नवीन पिढीला कितीतरी खेळ माहितही नाहीत. उदाहरणादाखल “ गोट्या खेळणे “ हा खेळ सार्वजनिक आहेत. मात्र गोट्या खेळण्याच्या पद्धती प्रत्येक ठिकाणी वेगळ्या आहेत. स्थानिक ठिकाणी गोट्या खेळण्याचे विविध प्रकार आढळतात, ढब्बू, सोरड, कुर्बानी, येईल तशा, चिंगाट इ. प्रकार एका स्थानावर आढळतात, तर दुसऱ्या ठिकाणी दुसरे प्रकार, शिवाय या खेळासंबंधी असलेले शब्दही अगदी निराळेच असतात. अशा खेळांचे व खेळविषयक शब्दांचे संवर्धन करणे आवश्यक आहे.
विटीदांडू, सूरपारंव्या, आट्यापाट्या, काचा कवड्या असे अगणित खेळ खेळले जातात. या खेळांमधून मुलांची एकाग्रता वाढते, सांघिक वृत्ती निर्माण होते, बौद्धिक क्षमता वाढते, व्यायाम होतो असे फायदे होतात. सध्या मोबाईल व संगणकावरील ‘गेम’ खेळून मुलांचे मानसिक व आरोग्यविषयक संतुलन बिघडत चाललेले आहे. त्यावर घरबसल्या खेळले जाणारे खेळ त्यांच्या समोर आले तर मोठा फायदा होईल.
लोप पावत चाललेले शब्द, खेळ, प्रथा / परंपरा / उत्सव / कार्यक्रम याबरोबरच अनेक लोकगीते, लोककला, लोककथा, लोकसाहित्यांचे मौखिक परंपराव्दारे संवर्धन झालेले आहे. मौखिक परंपरेने आलेले साहित्य काळाच्या ओघात नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळे लोकगीते, लोककला, लोककथा, लोकसाहित्य यांचेही संवर्धन समाज माध्यमे व इंटरनेटच्या माध्यमातून होऊ शकते.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा धोरणानुसार मराठीची व्याप्ती वाढविणे, भाषा बोली/ भाषेतील शब्दांचे जतन करणे, भाषा संवर्धन करणे असे विवध कार्यक्रम सुरु असतात. यामध्ये जर ग्रामीण खेळांचे संवर्धन ग्रामीण शब्दांचे संवर्धन व ग्रामीण प्रथा, परंपरा, उत्सव, समारंभ, कार्यक्रम इ. चे जतन अशा कार्यक्रमांचा अंतर्भाव केला तर अनेक लोप पावत जाणाऱ्या बाबींचे संवर्धन होऊ शकेल.
याकरिता समाज माध्यमे व इंटरनेटचा वापर खुबीने करता येईल. आजकाल ग्रामीण व शहरी मुलांकडे इतकेच नव्हे वयोवृद्धांकडेही मोबाईल उपलब्ध आहेत. कॉलेज मधील विद्यार्ध्यांमार्फत जर अशा शब्दांचा संग्रह स्पर्धांव्दारे वाढविला तर नक्कीच मराठीतील गळून चाललेल्या पाकळ्यांचे संवर्धन होईल. त्यासाठी रितसर, सुलभ व प्रेरणा अंतर्भूत असणारी पद्धती विकसित करावी लागेल. याकामी विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, इतर संस्था यांची मदत घेता येईल. निबंध स्पर्धा, ऑनलाइन टूल निर्मिती यांच्या माध्यमातून हे संवर्धन सहज शक्य आहे.
महाराष्ट्रातील लुप्त होणाऱ्या लोककला, प्रथा परंपरा सण उत्सव, खेळ शब्द सांस्कृतिक घटक खाद्यसंस्कृती आदी घटकांचे जतन व संवर्धन करण्यासाठी उपयुक्त अशा संकेतस्थळाची निर्मिती करणे
आपली दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण माहिती अपलोड करा